Showing posts with label MahaVikasAghadi.. Show all posts
Showing posts with label MahaVikasAghadi.. Show all posts

25 December, 2019

भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवू शकेल?


२४ ऑक्टोबर २०१९ ला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले. त्यामध्ये महायुतीला १६१ जागा मिळून बहुमत मिळाले. जनादेशानुसार महायुतीची सत्ता स्थापन होणे अपेक्षित होते परंतु त्यानंतर जे सत्तानाट्य झाले ते महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पहिले. महायुतीतील एक महत्वाचा घटकपक्ष असलेला शिवसेना युतीतून फुटून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला व मुख्यमंत्रिपद मिळवले. शिवसेनेच्या या खेळीने मुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी भविष्यात या घटनेचे काय परिणाम होऊ शकतात हे येणाऱ्या निवडणुकांत कळेलच. जनादेशाचा स्पष्ट अर्थ महायुतीची सत्ता यावी असा होता परंतु फक्त भाजपला सत्तेतून बाहेर ठेवणे आणि मुख्यमंत्रीपद मिळवणे एवढ्या कारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार मतदारांवर थोपण्याचे परिणाम शिवसेनेला येणाऱ्या निवडणुकांत भोगावेच लागतील. पण या नव्या समीकरणांमुळे तात्पुरता भाजपची सत्ता गेली असली तरी भविष्यात मोठा लाभ त्यामुळे होऊ शकतो. किंबहुना यामुळे भाजपचे स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ते कसे ते आपण बघूया. 

स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याचे प्रयत्न भाजपने २०१४ सालीच सुरु केले होते. पण त्यात सर्वात मोठा अडसर होता तो शिवसेनेचा. कारण महाराष्ट्रात शिवसेनेची ओळख काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी होती. ज्यामुळे त्यांचा आणि भाजपचा मतदार हा समान होता. २०१४ विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्यावर हा मतदार विभागला गेला होता. २०१४ ला विरुद्ध लढूनही भाजपला २७.८१% मते मिळाली आणि सेनेला १९.३५% मिळाली. ही दोघांची मते मिळून ४७.१६% मते होतात जी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १ कोटी ४२ लाख मते मिळाली जी २५.७५% आहेत. आणि शिवसेनेला ९० लाख मते मिळाली जी १६.४१% आहेत. २०१४ पेक्षा २०१९ ला भाजपसेनेची मतांची टक्केवारी कमी झाली पण त्याचे खरे कारण बंडखोर उमेदवार आहेत. २०१९ ला इतर अपक्षांना १ कोटी २ लाख अशी भाजपनंतरची क्रमांक दोनची मते मिळाली जी १८.५% होतात. यामध्ये जवळपास ५०-७० लाख मते (११-१२%) ही भाजप-सेना बंडखोरांची आहेत जी योग्य खबरदारी घेतली असती तर भाजप-सेनेला मिळू शकली असती. आणि महायुतीच्या जागा २०० च्या पार गेल्या असत्या. पण जर-तरला आता काही महत्व नाही. 

परंतु आता शिवसेनेची काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख पुसली गेल्यामुळे शिवसेनेचा नाराज असलेला मतदार पूणपणे भाजपकडे जाणार आहे. हा मतदार सेनेला मिळालेल्या १६.४१% पैकी साधारणतः ३-३.५% असू शकतो. तसेच आता भाजप संपूर्ण २८८ जागांवर लढणार आहे त्यामुळे बंडखोरीची चिंता भाजपला नाही, जागावाटपाची कटकट असणार नाही. म्हणून २०१९ चे हे बंडखोर उमेदवार भाजपच्या गोटात जाऊन सहजपणे तिकीट मिळू शकतात. त्यामुळे २०१९ ला भाजप-सेना बंडखोरांना मिळालेल्या ११-१२% मतांपैकी ६-७% मते भाजप स्वतःकडे खेचून घेऊ शकतो. बंडखोरीची चिंता आता महाविकास आघाडीला करायची आहे कारण पुढे होणाऱ्या विधानसभेच्या (मध्यावधी?) निवडणुकांसाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करावीच लागेल. आणि तसे झाल्यास सेनेच्या वाट्याला १०० हुन कमी जागा येतील. त्यामुळे बंडखोरीची शक्यता खूप जास्त आहे. आणि जर योग्य जागावाटप न झाल्यामुळे सेनेनं आघाडी केली नाही तर ज्यांनी सत्ता एकत्र भोगली त्यांना आता एकमेकांचे पाय खेचत एकमेकांच्या विरोधातच लढावे लागेल. त्यामुळे मतदारांत बदनामी होईल ती वेगळी. हे सरकार जितके दिवस चालेल तितका त्यांच्यातला विसंवाद उघडकीला येईल आणि हे अस्थिर सरकार पडल्यावर अँटी इन्कबंसीचा फटका प्रामुख्याने मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेला जेवढा बसणार आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीला बसणार आहे. त्यामुळे त्यांचीही १-१.५% मते भाजपकडे जाऊ शकतात. यांच्यातले जेवढे मतभेद उघडकीला येतील तेवढा फायदा भाजप करून घेण्याचा प्रयत्न करेल. 

भाजपला २०१९ला मिळालेली २५.७५% मते तसेच सेनेची नाराज ३-३.५% मते, बंडखोरांची ६-७% आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची १-१.५% या सर्व टक्केवारीची बेरीज केली तर येणाऱ्या निवडणुकीत भाजपची १०-१२% मते वाढून ती एकूण ३५-३७% मते होऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत जेव्हा दोन पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा ४०% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. तसेच जेव्हा तीन पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा ३५% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. आणि जेव्हा चार पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा एखादा पक्ष ३०% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवतो त्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. आपण जर असे गृहीत धरले की महाराष्ट्रात आता भाजप, महाविकासआघाडी आणि वंचित, मनसे, अपक्ष (महाविकासआघाडी बंडखोर) अशी तिरंगी लढत होईल तर ३५-३७% मते मिळवून भाजप बहुमताने सत्ता स्थापन करेल असे दिसते. जागांच्या हिशेब लावला तर १% मते ४.२५-४.५ पट जागा बदलू शकतात. त्याहिशेबाने १०-१२% मतांच्या वाढीमुळे भाजपच्या ४३-५४ जागा वाढू शकतात. ज्यामुळे भाजपला एकूण १४८-१५९ जागा मिळू शकतात. 

शिवसेनेच्या जाण्यामुळे बिगरकाँग्रेसी स्पेस निर्माण झाली आहे ती पूर्ण व्यापण्याचा भाजप प्रयत्न करेल आणि आणि पूर्ण बहुमताने सरकार बनवण्याठीच भाजप मतदारांसमोर मते मागेल. पण ज्या चुका भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केल्या जसे उमेदवार आयात करणे, आपल्याच पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे, पक्षांतर्गत उमेदवार पाडणे असे प्रकार टाळले तर निश्चितच भाजपला स्वबळाने सत्ता मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 

20 December, 2019

शिवसेनेचा वैचारिक गोंधळ



महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून आता जवळपास दोन महिने होत आलेले आहेत. पण या कालावधीत मुख्यमंत्रीपदाच्या मोहात अडकलेल्या शिवसेनेला ज्या काही राजकीय तडजोडी कराव्या लागल्या त्यांचा उहापोह करणे गरजेचे आहे. कारण या सर्व तडजोडीचा तात्काळ काही परिणाम दिसत नसला तरी भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेणे गरजेचे असते. कारण नेते आज आहेत उद्या नाहीत पण पक्ष वर्षानुवर्षे टिकवायचा असतो त्यासाठी पक्षाचा समर्थक मतदार विचलित होईल, नाराज होईल असे घडू नये हे महत्वाचे असते. राजकीय महत्वाकांक्षा असणे गैर नाही, किंबहुना ती असायलाच हवी परंतु या महत्वाकांक्षेपायी आपल्या बहुसंख्य मतदाराला न रुचणारी भूमिका घ्यावी लागत असेल तर ती न घेण्यात राजकीय शहाणपण असते. पण काही वेळेला सत्तेच्या अथवा एखाद्या पदाच्या मोहात सापडलेले पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आत्मघातकी ठरेल असे निर्णय घेतानाची अनेक उदाहरणे इतिहासात नमूद आहेत.

मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नवी आघाडी तयार करण्यापर्यंत ज्या काही तडजोडी कराव्या लागल्या त्याची किंमत आधी शिवसेनेलाच द्यावी लागले ती केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन. तसेच शिवसेनेला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही दलातूनही (NDA) बाहेर पडावे लागले. ते बाहेर पडले असले तरी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीत (UPA) शिवसेनेचा प्रवेश झाल्याचे कुठेही दिसले नाही. ही आघाडी तयार करतांना किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला. हा किमान समान कार्यक्रम भाजपला सत्तेतून बाहेर ठेवणे एवढाच आहे. त्यात अनेक मुद्दे असले तरी शिवसेनेला सरकार चालवतांना "हिंदुत्व" आणि "प्रखर राष्ट्रवाद" हे दोन मुद्दे बाजूलाच ठेवावे लागतील हा मुख्य मुद्दा आहे. कारण शिवसेनेची ओळखच मुळात हिंदुत्ववादी पक्ष अशी आहे आणि तीच ओळख सत्तेसाठी बाजूला ठेवावी लागत आहे.
 पाकिस्तान बांगलादेशातील हिंदूंना भारतीय नागरिकत्व देणे, भारतातील बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावणे, पाकिस्तानला धडा शिकवणे अशा अनेक मागण्या बाळासाहेब ठाकरेंच्या १९८५ पासूनच होत्या, किंबहुना याच मुद्द्यांमुळे भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. पण आता या गोष्टींचा सेना नेतृत्वाला विसर पडलेला दिसत आहे. कारण काँग्रेससोबत सत्तेत असताना या मुद्द्यांवर उघड समर्थ करणे जाड जाऊ शकते याची जाणीव सेना नेतृत्वाला आहे. याची चुणूक आपल्याला संसदेत 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' आल्यावर दिसली. या विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत सरकारच्या समर्थानात मतदान केले. परंतु नंतर काँग्रेसकडून महाराष्ट्र सरकार पडण्याची धमकी मिळाल्यानंतर मात्र राज्यसभेत शिवसेनेला लोकसभेतील भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेत राज्यसभेत सभात्याग करावा लागला. यावर पत्रकार परिषदेत त्यांनी काहीही खुलासा केला असला तरी मतदाराला अशा भूमिका पटत नाहीत आणि तो यांची नोंद करून ठेवत असतो. यापुढे संसदेत एन.आर.सी विधेयक, सामान नागरी कायदा विधेयक, पाकव्याप्त काश्मीर मुद्दा असे अनेक महत्वाची विधेयके येणार आहेत. तेव्हा मात्र शिवसेना नेतृत्वाची कसोटीच लागणार आहे. कारण हे मुद्दे बाळासाहेब ठाकरेंना प्रिय होते पण आता त्याच शिवसेनेला त्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल असे वाटते. मतदार मात्र शांतपणे हे पाहत असतो. 

फक्त राष्ट्रीय पातळीवरच नाही तर राज्यपातळीवरही शिवसेनेचे मोठं नुकसान होऊ शकते. कारण महाराष्ट्रात शिवसेनेची ओळख काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी होती. ज्यामुळे त्यांचा आणि भाजपचा मतदार हा समान होता. २०१४ विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्यावर हा मतदार विभागला गेला होता. परंतु आता शिवसेनेची काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख पुसली गेल्यामुळे तो मतदार पूणपणे भाजपकडे जाणार आहे. त्याचे मोठे नुकसान शिवसेनेचे होणार आहे. तसेच पुढे होणाऱ्या विधानसभेच्या (मध्यावधी?) निवडणुकांसाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करावीच लागेल. आणि तसे झाल्यास सेनेच्या वाट्याला १०० हुन कमी जागा येतील. त्यामुळे बंडखोरीची शक्यता खूप जास्त आहे. भाजपचे तसे नाही त्यांना आता २८८ जागांवर लढायचे आहे, त्यांना आता जागावाटपाची कटकट असणार नाही. म्हणून हे बंडखोर उमेदवार भाजपच्या गोटात जाऊन सहजपणे तिकीट मिळू शकतात. आणि जर योग्य जागावाटप न झाल्यामुळे सेनेनं आघाडी केली नाही तर ज्यांनी सत्ता एकत्र भोगली त्यांना एकमेकांच्या विरोधातच लढावे लागेल. त्यामुळे मतदारांत बदनामी होईल ती वेगळी. हे सरकार जितके दिवस चालेल तितका त्यांच्यातला विसंवाद उघडकीला येईल आणि हे अस्थिर सरकार पडल्यावर अँटी इन्कबंसी चा फटका प्रामुख्याने मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेलाच बसणार आहे. त्यामुळे यांच्यातले जेवढे मतभेद उघडकीला येतील तेवढा फायदा भाजप करून घेण्याचा प्रयत्न करेल. शिवसेनेच्या जाण्यामुळे बिगरकाँग्रेसी स्पेस निर्माण झाली आहे ती पूर्ण व्यापण्याचा भाजप प्रयत्न करेल आणि आणि पूर्ण बहुमताने सरकार बनवण्याठीच भाजप मतदारांसमोर मते मागेल. पण यामुळे शिवसेनेचे जास्त नुकसान होणार आहे हे निश्चित.