२४ ऑक्टोबर २०१९ ला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले. त्यामध्ये महायुतीला १६१ जागा मिळून बहुमत मिळाले. जनादेशानुसार महायुतीची सत्ता स्थापन होणे अपेक्षित होते परंतु त्यानंतर जे सत्तानाट्य झाले ते महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पहिले. महायुतीतील एक महत्वाचा घटकपक्ष असलेला शिवसेना युतीतून फुटून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला व मुख्यमंत्रिपद मिळवले. शिवसेनेच्या या खेळीने मुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी भविष्यात या घटनेचे काय परिणाम होऊ शकतात हे येणाऱ्या निवडणुकांत कळेलच. जनादेशाचा स्पष्ट अर्थ महायुतीची सत्ता यावी असा होता परंतु फक्त भाजपला सत्तेतून बाहेर ठेवणे आणि मुख्यमंत्रीपद मिळवणे एवढ्या कारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार मतदारांवर थोपण्याचे परिणाम शिवसेनेला येणाऱ्या निवडणुकांत भोगावेच लागतील. पण या नव्या समीकरणांमुळे तात्पुरता भाजपची सत्ता गेली असली तरी भविष्यात मोठा लाभ त्यामुळे होऊ शकतो. किंबहुना यामुळे भाजपचे स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ते कसे ते आपण बघूया.
स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याचे प्रयत्न भाजपने २०१४ सालीच सुरु केले होते. पण त्यात सर्वात मोठा अडसर होता तो शिवसेनेचा. कारण महाराष्ट्रात शिवसेनेची ओळख काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी होती. ज्यामुळे त्यांचा आणि भाजपचा मतदार हा समान होता. २०१४ विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्यावर हा मतदार विभागला गेला होता. २०१४ ला विरुद्ध लढूनही भाजपला २७.८१% मते मिळाली आणि सेनेला १९.३५% मिळाली. ही दोघांची मते मिळून ४७.१६% मते होतात जी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १ कोटी ४२ लाख मते मिळाली जी २५.७५% आहेत. आणि शिवसेनेला ९० लाख मते मिळाली जी १६.४१% आहेत. २०१४ पेक्षा २०१९ ला भाजपसेनेची मतांची टक्केवारी कमी झाली पण त्याचे खरे कारण बंडखोर उमेदवार आहेत. २०१९ ला इतर अपक्षांना १ कोटी २ लाख अशी भाजपनंतरची क्रमांक दोनची मते मिळाली जी १८.५% होतात. यामध्ये जवळपास ५०-७० लाख मते (११-१२%) ही भाजप-सेना बंडखोरांची आहेत जी योग्य खबरदारी घेतली असती तर भाजप-सेनेला मिळू शकली असती. आणि महायुतीच्या जागा २०० च्या पार गेल्या असत्या. पण जर-तरला आता काही महत्व नाही.
परंतु आता शिवसेनेची काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख पुसली गेल्यामुळे शिवसेनेचा नाराज असलेला मतदार पूणपणे भाजपकडे जाणार आहे. हा मतदार सेनेला मिळालेल्या १६.४१% पैकी साधारणतः ३-३.५% असू शकतो. तसेच आता भाजप संपूर्ण २८८ जागांवर लढणार आहे त्यामुळे बंडखोरीची चिंता भाजपला नाही, जागावाटपाची कटकट असणार नाही. म्हणून २०१९ चे हे बंडखोर उमेदवार भाजपच्या गोटात जाऊन सहजपणे तिकीट मिळू शकतात. त्यामुळे २०१९ ला भाजप-सेना बंडखोरांना मिळालेल्या ११-१२% मतांपैकी ६-७% मते भाजप स्वतःकडे खेचून घेऊ शकतो. बंडखोरीची चिंता आता महाविकास आघाडीला करायची आहे कारण पुढे होणाऱ्या विधानसभेच्या (मध्यावधी?) निवडणुकांसाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करावीच लागेल. आणि तसे झाल्यास सेनेच्या वाट्याला १०० हुन कमी जागा येतील. त्यामुळे बंडखोरीची शक्यता खूप जास्त आहे. आणि जर योग्य जागावाटप न झाल्यामुळे सेनेनं आघाडी केली नाही तर ज्यांनी सत्ता एकत्र भोगली त्यांना आता एकमेकांचे पाय खेचत एकमेकांच्या विरोधातच लढावे लागेल. त्यामुळे मतदारांत बदनामी होईल ती वेगळी. हे सरकार जितके दिवस चालेल तितका त्यांच्यातला विसंवाद उघडकीला येईल आणि हे अस्थिर सरकार पडल्यावर अँटी इन्कबंसीचा फटका प्रामुख्याने मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेला जेवढा बसणार आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीला बसणार आहे. त्यामुळे त्यांचीही १-१.५% मते भाजपकडे जाऊ शकतात. यांच्यातले जेवढे मतभेद उघडकीला येतील तेवढा फायदा भाजप करून घेण्याचा प्रयत्न करेल.
भाजपला २०१९ला मिळालेली २५.७५% मते तसेच सेनेची नाराज ३-३.५% मते, बंडखोरांची ६-७% आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची १-१.५% या सर्व टक्केवारीची बेरीज केली तर येणाऱ्या निवडणुकीत भाजपची १०-१२% मते वाढून ती एकूण ३५-३७% मते होऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत जेव्हा दोन पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा ४०% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. तसेच जेव्हा तीन पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा ३५% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. आणि जेव्हा चार पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा एखादा पक्ष ३०% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवतो त्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. आपण जर असे गृहीत धरले की महाराष्ट्रात आता भाजप, महाविकासआघाडी आणि वंचित, मनसे, अपक्ष (महाविकासआघाडी बंडखोर) अशी तिरंगी लढत होईल तर ३५-३७% मते मिळवून भाजप बहुमताने सत्ता स्थापन करेल असे दिसते. जागांच्या हिशेब लावला तर १% मते ४.२५-४.५ पट जागा बदलू शकतात. त्याहिशेबाने १०-१२% मतांच्या वाढीमुळे भाजपच्या ४३-५४ जागा वाढू शकतात. ज्यामुळे भाजपला एकूण १४८-१५९ जागा मिळू शकतात.
शिवसेनेच्या जाण्यामुळे बिगरकाँग्रेसी स्पेस निर्माण झाली आहे ती पूर्ण व्यापण्याचा भाजप प्रयत्न करेल आणि आणि पूर्ण बहुमताने सरकार बनवण्याठीच भाजप मतदारांसमोर मते मागेल. पण ज्या चुका भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केल्या जसे उमेदवार आयात करणे, आपल्याच पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे, पक्षांतर्गत उमेदवार पाडणे असे प्रकार टाळले तर निश्चितच भाजपला स्वबळाने सत्ता मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

No comments:
Post a Comment